विज्ञान प्रसारक संस्था


मराठी विज्ञान महासंघ
विज्ञान प्रसार - विज्ञान प्रसारक संस्था

मराठीतून विज्ञानाचा प्रसार करणाऱ्या सर्व संस्थांचे प्रतिनिधीत्व करणारी फेडरल पध्दतीची `मराठी विज्ञान महासंघ' ही संस्था ४ फेब्रुवारी १९७७ रोजी मुंबईत नोंदण्यात आली. मराठीतून विज्ञान प्रसार करणार्‍या विविध संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या निरनिराळया कार्यपध्दतीच्या अनुभवांचा फायदा सर्वांना मिळण्यासाठी अशा सर्व संस्थांचा एक संघ असावा या जाणिवेतून `मराठी विज्ञान महासंघाची' निर्मिती झाली. महासंघाची स्थापना ही विज्ञान प्रसाराच्या वेगवान प्रगतीमधील एक नैसर्गिक व अटळ घटना होय.

मराठी विज्ञान महासंघ हा संस्थांचा संघ असल्याने महासंघाला व्यक्ती सभासद नाहीत. महासंघाच्या घटक संस्थांच्या सर्व सभासदांचे प्रतिनिधित्व महासंघ करतो. घटक संस्थांचे स्वायत्त स्वरूप कायम राहून त्यांना त्यांच्या सभासद संख्येच्या प्रमाणात महासंघाच्या प्रतिनिधी मंडळावर प्रतिनिधित्व मिळते. विज्ञान व त्याच्या प्रसाराविषयी समाजात असलेली अनास्था तसेच कार्यकर्त्यांची वाण व तोकडे आर्थिक बळ या सर्वांवर मात करण्यासाठी घटक संस्थांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह हीच महासंघाची कार्यशक्ती.

महासंघाचे मासिक मुखपत्र `मराठी महासंघ विज्ञान' प्रकाशनास जुलै १९७८ पासून सुरूवात झाली. अखिल महाराष्ट्नत व महाराष्ट्नबाहेरही महासंघाचे १५०० सभासद विखुरले असल्याने या सर्वांशी सततचा संपर्क साधणे या मुखपत्राच्या आधाराने शक्य असल्याने हे प्रकाशन प्रतिमासी प्रकाशित करण्यात आजवर महासंघाला यश मिळाले आहे. महासंघाच्या घटकसंस्थांमार्फत होणाऱ्या वैज्ञानिक कार्याचा वृत्तांत, तसेच जगातील विशेष महत्वाच्या वैज्ञानिक घटनांची नोंद या मुखपत्रातून घेतली जात असल्याने सभासदापर्यंत वैयक्तिक स्तरावर विज्ञान पोहोचविणे महासंघास शक्य झाले आहे.

घटक संस्थांच्या कार्यात सुसूत्रता ठेवण्याचा एक भाग म्हणून समान व सदृश कार्यक्रम घटक संस्थांमार्फत महासंघ घडवून आणतो. समान असा एकच कार्यक्रम विविध घटक संस्थांमार्फत आयोजित केला जातो तर एखाद्या विषयाला धरून विविध कार्यक्रम निरनिराळया ठिकाणी सदृश कार्यक्रमावाटे आयोजित केले जातात. याशिवाय विविध विषयावर व्याख्याने, परिसंवाद, संस्थाभेटी, वैज्ञानिक चर्चा वगैरे कार्यक्रम घटक संस्थांमार्फत केले जातात.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मराठी विज्ञान परिषद  
 
१९५७ साली रशियाने अवकाशात पहिला उपग्रह उडवला. १९५८ साली भारताचे वैज्ञानिक धोरण जाहीर झाले. १९६५ साली पंतप्रधान लालबहादुर शास्त्रींच्या नेतृत्वाखाली हरितक्रांतीची सुरूवात झाली. या आणि अशा सारख्या इतर घटनांमुळे हे काय घडते आहे याबद्दल समाजात एक कुतूहल निर्माण झाले होते. लोकांच्या मागणीमुळे वर्तमानपत्रात विमान विषय लेख तुरळकपणे दिसू लागले होते आणि साहित्य संस्थातून विज्ञान विषयावरील एखाद दुसरे भाषण होऊ लागले होते. समाजाची ही वाढती गरज लक्षात होऊन विज्ञान विषयक कार्य करणारी एखादी स्वतंत्र संस्था असावी असे काही जाणत्या लोकांना वाढले आणि त्यातूनच २४ एप्रिल, १९६६ रोजी मराठी विज्ञान परिषदेची मुंबईत स्थापना झाली.

संस्थेचे उद्देश खालीलप्रमाणे आहेत.
१) विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठीतून करणे.
२) विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृध्द करणे.
३) विज्ञानाचे जीवनात महत्व वाढवणे.
४) वैज्ञानिक संशोधन व विज्ञानाची प्रगती करणे या चार उद्देशांसाठी परिषदेने काम करायचे ठरवले.

परिषदेचे अध्यक्ष म्हणून नामवंत डॉक्टर आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रा. वि. साठे यांची आणि स्थापत्य अभियंता श्री. म. ना. गोगटे याची कार्यवाहपदी निवड झाली. पहिल्याच कार्यकारिणीत मधुमेहतज्ज्ञ डॉ. श्री. शा. आजगांवकर, गणितज्ज्ञ रँग्लर का. रा. गुंजीकर, प्रा. चिं. श्री. कर्वे, प्रा. प. म. बर्वे, प्रा. ना. वा. कोगेकर, सर्पतज्ज्ञ डॉ. पु. ज. देवरस इ. तज्ज्ञ होते.

परिषद मुंबईस सुरू झाल्यावर लवकरच महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर परिषदेच्या शाखा व विभाग सुरू झाले. परिषदेचे आज असे ५० विभाग आहेत. स्थापनेनंतर लगेचच संस्था धर्मादाय आयुक्त कायदा आणि सोसायटी कायद्याखाली नोंदली गेली.काही वर्षाने महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने मराठी विज्ञान परिषदेस संशोधन आणि सांस्कृतिक कार्य करणारी संस्था म्हणून मान्यता दिली. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने मराठी विज्ञान परिषदेस मान्यता दिली असून अनेक कार्यक्रमांसाठी परिषदेस सरकार आणि शासनाकडून अनुदान मिळत असते. परिषदेस देणग्या देणार्‍यास आयकर खाते ८०-जी प्रमाणपत्रान्वये निम्म्या रकमेवर सवलत मिळते.

वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई येथे परिषदेची ६६० चौ. मी. क्षेत्रफळाची स्वत:च्या मालकीची दोन मजली इमारत असून आज या इमारतीत ४० आणि १७० माणसे बसू शकतील अशी दोन सभागृहे आहेत. या सभागृहात खुर्च्या, ध्वनीक्षेपक यंत्रणा, व्ही. सी. आर., ओव्हरहेड प्रोजेक्टर, स्लाईड प्रोजेक्टर, फळा इ. सोयी आहे. परिषदेत १५ कर्मचारी पूर्ण वेळ काम करतात. फोन, फॅक्स, इंटरनेट अशा सर्व आधुनिक सोयी परिषदेत आहेत.