UPSC Prelims 2011


यूपीएससी पूर्वपरीक्षा पेपर १ असो वा २, ते अवघड कसे हे समजायला जास्त श्रम नाहीत. आपण ज्यांच्याशी बोलतोय त्यांना यूपीएससीचा अ‍ॅप्रोच आहे किंवा नाही याची काळजी न घेता, कुणाशीही ‘अभ्यास कसा करू’ अशी चर्चा करा, यूपीएससी किती व कशी अवघड हे सोप्या भाषेत तुम्हाला सांगतील. दुर्दैवाने असेच ‘मार्गदर्शक’ आपल्या राज्यात विपुल संख्येत उपलब्ध आहेत. हो. मात्र पूर्वपरीक्षा सोपी कशी आहे हे समजून घेऊन अभ्यास करणे मात्र थोडेसे अवघड आहे. म्हणूनच महत्त्वाची ठरते नव्या पॅटर्नला, पूर्वपरीक्षा २०११ ला सामोरे जाण्यापूर्वीची रणनीती.
आयएएस/ आयपीएस/ आयएफएस/ आयआरएस/ आयआरटीएस.. अशा पदांवर पोहोचण्यासाठीच्या मार्गातले पहिले गेट म्हणजे पूर्वपरीक्षा. पूर्वपरीक्षा ही चाळणी परीक्षा आहे. मुख्य परीक्षेत, मुलाखतीत वा अंतिम गुणतालिकेत पूर्वपरीक्षेचे गुण ‘काऊंट’ केले जात नाहीत, पण हे ‘गेट’ उघडल्याशिवाय आपण आयएएस/ आयपीएस.. चे स्वप्नही साकार करू शकत नाही. 

म्हणूनच पूर्वपरीक्षेला ‘लाईटली’ घेऊन चालत नाही आणि नव्या पॅटर्नची धास्ती घेऊनही चालणार नाही.

जुन्या पॅटर्नप्रमाणे पूर्वपरीक्षेसाठी दोन पेपर असतील. पहिला पेपर सामान्य अध्ययन (जी.एस.) आणि दुसरा पेपर सामान्य अभिरुची अर्थात अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट, जी.एस. किंवा सी सॅट ही आयोगाने अधिकृतपणे घोषित केलेली पेपर्सची नावे नव्हेत; हे नामकरण आपण सर्वानी सोयीसाठी केलेले आहे. वैकल्पिक विषयाचा दुसरा पेपर रद्द करून संपूर्णत: नवीन सामान्य अभिरुचीचा पेपर आता योजिला आहे.

पूर्वपरीक्षेद्वारे ‘ज्ञान’, मुख्य परीक्षेतून ‘माहिती’ आणि मुलाखतीद्वारे व्यक्तिमत्त्व चाचणी, अभिरुचीचा कल, निर्णयक्षमता तपासली जायची. नव्या पॅटर्नमधली नवी गोष्ट ही की, उमेदवाराच्या अभिरुचीचा कल जो मुलाखतीत जोखला जायचा, आता पूर्वपरीक्षेच्या पहिल्या टप्प्यापासूनच तपासला जाईल. म्हणजे एका अर्थाने अभ्यासाची ‘लांबी आणि रुंदी’ वाढते आहे. हा बदल स्वागतार्ह आहे आणि स्वागताचा एकमेव मार्ग ‘अभ्यास’ आहे. पेपर १ व २ मधील प्रत्येक घटकावर एक स्वतंत्र लेख लिहून आपण चर्चा आणि अभ्यास करणार आहोत. या लेखात ज्या नव्या बदलांचा बाऊ केला जातोय, त्यातल्या सोप्या आणि सकारात्मक बाबींचा आपण विचार करूया.

नवा बदल आपण कसा स्वीकारतो, सामोरा जातो यातच तुमची निर्णयक्षमता, तुमच्या अभिरुचीचा कल पणाला लागेल. म्हणजे अभ्यासाच्या पहिल्या पायरीपासूनच ‘चांगला अधिकारी’ घडण्याची प्रक्रिया सुरू होईल.

पूर्वपरीक्षेचे दोन्ही पेपर्स २०० गुणांचे असतील व त्यासाठी प्रत्येकी दोन तासांचा कालावधी निर्धारित केला आहे. मात्र या पेपर्समध्ये एकूण किती प्रश्न असतील व त्यांची गुणविभागणी कशी असेल हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. जे गुलदस्त्यात आहे त्याचा विचार करून डोकं खर्ची घालण्यात कोणतं लॉजिक आहे. यापूर्वी जी.एस. १२० मिनिटांत १५० प्रश्न व वैकल्पिक विषय १२० मिनिटांत १२० प्रश्न असा पॅटर्न होता. यूपीएससी सीडीएस, एनडीच्या परीक्षा घेते. एनडीएए परीक्षेत जनरल अ‍ॅबिलिटी टेस्ट पेपर हा १५० मिनिटांसाठी असून प्रश्न असतात १५०. दुसरा गणिताचा पेपर १२० प्रश्न व वेळ १५० मिनिटे. आयोगाच्या या सवयी पाहिल्या की सर्वसाधारणपणे अंदाज बांधता येईल की पूर्वपरीक्षेच्या पेपर १ व २ ला प्रश्नांची संख्या ही कमीत कमी १२० किंवा १५० किंवा २०० असेल असे गृहित धरायला हरकत नाही. प्रश्न कितीही असोत आपल्याला सोडवायचेच आहेत, तेव्हा याचाही जास्त विचार नको. दोन्ही पेपर्स हे वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्नांनी बनलेले असतील, हे तर पक्के आहे. शिवाय यूपीएससीच्या वेबसाईटवर प्रश्नांचे नमुने प्रसिद्ध होणारच आहेत, तेव्हा हा मुद्दा निकाली. सर्वाधिक संभ्रम आहे तो अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टसंदर्भात. आयोगातर्फे वेबसाईटवर मॉडेल टेस्ट पेपर प्रसिद्ध झाल्यानंतर त्याबाबत पुरते चित्र स्पष्ट होईल. प्रसिद्ध झालेला अभ्यासक्रम पाहता काही अंदाज नक्कीच बांधता येतात. प्रश्नांचे स्वरूप ‘भयंकर’ कठीण तर नक्कीच नसेल. हा पेपर बँकिंग परीक्षा किंवा मॅनेजमेंट परीक्षा स्तराचा असेल का हे स्पष्ट होत नाही. पण प्रश्नांचा स्तर ‘इयत्ता दहावी’चा असेल हे मात्र क्लीअर आहे. इथे पण एक संभ्रम आहे, सर्वसाधारणपणे दहावीस्तरीय म्हणजे आपण समजतो, राज्य पाठय़पुस्तक मंडळाची दहावी, नव्हे! तर सीबीएसई बोर्डाची दहावी. स्टेट बोर्डाची दहावी व सीबीएसई दहावी यात ‘जमीन- आसमान’ असे अंतर आहे. इतिहास विषयाचे जी.एस.मधले काही वस्तुनिष्ठ प्रश्न ‘एम.ए. इतिहास’ विद्यार्थ्यांला घाम फोडणारे असतात हे आपण पाहतो. सोबत असाही तर्क व्यक्त होतोय की, प्रश्नांचा स्तर कॅट परीक्षेचा नक्कीच नसेल. २००९ व २०१० पूर्वपरीक्षेचे जी.एस. पेपर आवर्जून पाहा. बुद्धिमत्ता चाचणी स्वरूपात विचारले गेलेले प्रश्न हे भविष्यकाळातील अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टचे संकेत देणारे होते. साधारण तशाच स्वरूपाच्या प्रश्नांचा स्तर असेल असा होरा आहे. प्रश्नांचे स्वरूप कसेही असू द्या, तयारीसाठी उपयुक्त संदर्भसाहित्य आपल्या राज्यात येत्या काही दिवसांत उपलब्ध होईल. आयोगाच्या रणनीतीला पर्याय आहे तो आपल्या अभ्यासाचा.

पूर्वी वैकल्पिक विषय ३०० गुणांसाठी तर सामान्य अध्ययन १५० गुणांसाठी होता. उमेदवार वैकल्पिक विषयावर जास्त फोकस करायचे कारण एक प्रश्न अडीच गुणांसाठी होता तर जी.एस. एक गुणासाठी. जी.एस.मध्ये टार्गेट असायचे ५०-६० गुणांचे व बाकीची ताकद खर्ची लागायची वैकल्पिक विषयाच्या कारणी. पण आता परिस्थिती बदलली आहे. दोन्ही पेपर्स समान म्हणजे २०० गुणांसाठी असणार आहेत. सामान्य अध्ययनाचा अभ्यासक्रम पूर्वीच्या तुलनेत विस्ताराने स्पष्ट झाल्यामुळे तयारीलाही एक निश्चित चौकट मिळाली आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमात काही नवीन घटकांचा समावेश केला गेला आहे. त्याबाबतची सविस्तर चर्चा स्वतंत्र लेखात.
नव्या बदलाला सामोरे जाण्याची रणनीती म्हणजे अभ्यासाला पर्याय फक्त अभ्यासाचा. नव्या पॅटर्नचा ‘बुखार’ अजूनही उतरत नसेल तर खालील तीन बाबी वाचा व निश्चिंत व्हा.

प्रश्नांसोबत उत्तरे दिलेलीच असतात,
तुम्ही फक्त योग्य उत्तर शोधायचे.
परीक्षकाच्या मनाला इथे शून्य वाव.
बी रिलॅक्स. जुन्या पॅटर्नला पर्याय नवे पॅटर्न.
नव्या पॅटर्नला पर्याय नवी रणनीती.
पण अभ्यासाला पर्याय फक्त अभ्यासच
अभ्यासाला पर्याय फक्त अभ्यासच

फारुक नाईकवाडे , बुधवार, ८ डिसेंबर २०१०steelframe@indiatimes.com , संपर्क- ९८१९९५४००७