**स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मुलाखत ही अंतिम पातळी आहे. ही ३०० मार्कांची परीक्षा असते. उमेदवाराची निवड तसेच श्रेणी ठरवण्यासाठी हे गुण निर्णायक ठरतात. वास्तविक मुलाखत उमेदवारामध्ये असणारी नागरी सेवांसाठीची उपयुक्तता व अनुरूपता तपासून पाहण्याचे कार्य करते. म्हणूनच मुलाखत ही एकाच वेळी सर्वात अवघड आणि सर्वात सोपी परीक्षा म्हटली जाते. अवघड कशासाठी की ज्या परिस्थितीला किंवा प्रश्नांना सामोरे जावे लागते, त्याचा अंदाज बांधता येणे कठीण असते आणि सोपी यासाठी की ही ज्ञानाची परीक्षा नसून व्यक्तिमत्त्वाची चाचणी आहे.
मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांमध्ये असा गैरसमज आहे की, मुलाखतीची तयारी करणे ही एक अवघड गोष्ट आहे. मुलाखतीविषयी नक्की काय अपेक्षित आहे, हे तपासणे आवश्यक आहे.
अभ्यासक्रम
अभ्यासक्रम लक्षात घेतल्यावर समजून येईल की प्रामुख्याने कोणत्या गोष्टींना महत्त्व देते.
उदा.-
१.उमेदवाराची/विद्यार्थ्यांची शैक्षणिक कारकीर्द व संबंधित विषय.
२.सामान्यज्ञान मुख्यत: चालू घडामोडी.
३.राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना.
४.आधुनिक विचासरणीचे सद्य:प्रवाह.
५.उच्चशिक्षित तरुणांमध्ये चौकसपणा/चिकित्सकपणा जागृत करणारी नवीन संशोधने इत्यादीविषयी माहिती.
तसे पाहिले तर जगातील कोणतीही गोष्ट मुलाखतीत विचारली जाऊ शकते. पण असे जरी वाटले तरी खरे पाहता मुलाखतीच्या तयारीसाठी एक ढोबळ चौकट/रचना करता येऊ शकते.
मुलाखतीची तयारी - मुलाखतीच्या तयारीची सुरुवात अगदी मुख्य परीक्षेचा चाफॉर्म भरण्यापासून सुरू होते. या फॉर्मला विद्यार्थ्यांची सर्व आवश्यक माहितीपत्रके जोडलेली असतात. उदा. पार्श्वभूमी, विद्यालयीन/शालेय विषय, करिअर, छंद, आवड, सेवांचा प्राधान्यक्रम इत्यादी. मुलाखत डोळ्यासमोर ठेवून अत्यंत विवेकबुद्धीनेच मुख्य परीक्षेचा फॉर्म भरावा. तुमची माहिती कमी किंवा जादा करून लिहिण्याचा प्रयत्न करू नका. यासंबंधीची माहिती भरताना जबाबदारीपूर्वक भरावी. आपण ज्यात सहभाग घेतला असेल अशा सर्व उपक्रमांचा या वेळी गांभीर्याने विचार करावा.
***तुमच्या आवडी, छंद इत्यादीविषयी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उदा. पुस्तकांचे वाचन आणि विकासाभिमुख पुस्तकांचे वाचन हे दोन वेगवेगळे घटक आहेत. (फॉर्मच्या माध्यमातून माहिती पुरवताना नेमक्या पण निश्चित शैलीत संदेश पोहोचवावा. मुलाखतीसाठीच्या वाचनाची/अभ्यासाची खरी सुरुवात मुख्य परीक्षेनंतर होते. या तयारीसंदर्भात दोन विचार (स्कूल ऑफ थॉट्स) मांडले जातात.
***पहिला असा की, मुलाखतीची तयारी करता येऊ शकत नाही. कारण एखाद्याचे व्यक्तिमत्त्व असे ६ महिन्यांमध्ये बदलता येत नाही आणि दुसरा विचार म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व आपण वळवू/बदलू शकतो व त्यासाठी जाणीवपूर्वक तयारी आवश्यक आहे. याचे व्यवहार्य उत्तर दोन्ही विचारांच्या मध्येच कुठेतरी आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू आहेत की जे बदलता येणे कठीण असते. पण तयारी म्हणजे हे घटक/पैलू कशा प्रकारे हाताळायचे याची जाणीव करून घेणे. याउलट व्यक्तिमत्त्वाचे काही विशेष घटक असतात जे नागरी सेवांसाठी अत्यंत अनुरूप असतात.
या सर्व घटकांची खोलात जाऊन तयारी केली पाहिजे. मुलाखतीला पूर्णत्व प्राप्त होण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. त्यामुळे व्यक्तिमत्त्व चांगले किंवा अनुरूप कसेही असो, तयारी आवश्यकच आहे.
१.बौद्धिक दक्षता (मेंटल अलर्टनेस)
२.क्रिटिकल पॉवर ऑफ अॅसिमलेशन, समीक्षणात्मक दृष्टिकोनातून विचार आत्मसात करण्याची प्रवृत्ती.
३.स्पष्ट आणि तार्किक स्पष्टीकरण.
४.परीक्षणातील समतोल.
५.छंद/आवड यामधील विविधता तसेच सखोलता.
६.सामाजिक दायित्व व समाजाभिमुखता.
७.बौद्धिक आणि नैतिक बांधिलकी.
****तुमच्यामध्ये असणा-या सगळ्या गुणवैशिष्ट्यांसह तुमच्याबद्दलची माहिती बायोडेटामध्ये भरा आणि त्यातील प्रत्येक छोट्या-छोट्या घटकावर जास्तीत जास्त प्रश्न तयार करा. प्रश्न कोणत्याही प्रकारचे असोत, वस्तुनिष्ठ आकलनात्मक किंवा वादग्रस्तसुद्धा! या सर्व प्रश्नांची फाइल किंवा वही तयार करून ठेवा. मुलाखतीच्या तयारीतील सुरुवातीचा वेळ मुख्यत्वेकरून यासाठी खर्च करा. याबरोबर तुमची संवादशैली सुधारा. मुलाखतीचा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पण तो ब-याचदा दुर्लक्षित राहतो. तुम्हाला पूर्णपणे माहीत असेल की तुम्हीच नागरी सेवांसाठी योग्य उमेदवार आहात. तरीही तुमच्यातील विशेष गुण तुम्ही योग्य प्रकारे सादर केले नाहीत तर परीक्षकांना तसा विश्वास वाटणार नाही.
संवादशैलीमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.
१.विचारलेला प्रश्न नीट ऐकणे आणि समजावून घेणे.
२.प्रश्नाचे उत्तर योग्य शब्दांत तसेच योग्य पद्धतीने, शिष्टाचाराला अनुसरून देणे.
३.उत्तरातील महत्त्वाचे भाग सुरुवातीला सांगावेत किंवा प्रश्नाच्या अनुरूपतेनुसार मांडावेत.
४.उत्तर संपवतानाही योग्य पद्धत असावी. म्हणजे उत्तर अर्धवट न सोडता उत्तर संपल्याचे व्यवस्थित निदर्शनास आणून द्यावे. या ठिकाणी ज्ञान अथवा माहिती अपूर्ण असू शकते. पण उत्तर मात्र पूर्णच असले पाहिजे. मराठीमध्ये मुलाखत देणा-यांनीसुद्धा या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. ब-याचदा उमेदवाराची मराठी भाषा खूप चांगली असते. पण जर तो चांगला संवाद करू शकत नसेल तर काही उपयोग होत नाही.
***याउलट इंग्रजीमधून मुलाखत देणा-यांना भाषेवर प्रभुत्व नसल्याने न्यूनगंडदेखील येतो. मुलाखतीसाठी साधे व माहितीतले सामान्य शब्द वापरावेत. तसेच इंग्रजीची अवाजवी धास्तीसुद्धा बाळगू नये. यावर मात करण्यासाठी दररोज बोलीभाषासुद्धा इंग्रजीच वापरावी. म्हणजे यूपीएससीच्या व्यतिरिक्तसुद्धा इंग्रजीतून संभाषण करावे. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी याप्रकारे प्रयत्न केले तर संवादकौशल्ये सुधारण्यासाठी एक महिना पुरेसा आहे.
****यानंतर व्यक्तिगत प्रश्नांची तयारी करण्यासाठी पार्श्वभूमी, शैक्षणिक पात्रता इत्यादीसंबंधीचे प्रश्न विचारात घ्या. याची उत्तरे ख-याखु-या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करा. तसेच टेपरेकॉर्डर किंवा मोबाइल अशा कशामध्येही तुमचे उत्तर रेकॉर्ड करा. शक्य तितके महत्त्वाचे मुद्दे लिहून ठेवा. जे उत्तरासाठी साहाय्यभूत ठरतील. पण संपूर्ण उत्तरच लिहिणे चुकीचे आहे. कारण ही लेखी नाही तर तोंडी परीक्षा आहे.
***अशाच प्रकार तुमचे सर्व व्यक्तिगत घटक, जिल्हा व राज्य इत्यादीबाबत तयारी करा. याबरोबर चालू घडामोडी, सद्य:घटना आणि संशोधने यावर लक्ष ठेवून त्यांच्यावरील प्रश्नांचे संच तयार करा. एकदा बायोडाटावर पक्की तयारी झाली की मग नंतर सद्य:घटनांकडे वळून त्यांची उत्तरे तयार करणे व त्याबद्दल मत अथवा भाष्य तयार करणे इत्यादी गोष्टी करा. चांगली माहिती जमवण्याच्या दृष्टीने मराठी विश्वकोश, इंटरनेट तसेच एखादे चांगले वाचनालय यांचा आधारसुद्धा घेतला जाऊ शकतो. अति प्रचंड साहित्य किंवा माहिती यांच्यामागे पळू नका. त्यापेक्षा माहीत असलेल्या गोष्टी व्यवस्थित सांगता याव्यात, यासाठी संभाषणकला याबाबतीत सुधारणा आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.
***एकदा का मुलाखतीची प्रत्यक्ष तारीख घोषित झाली की त्या अनुषंगाने तयारीचे नियोजन करा आणि सतत हे लक्षात असू द्या की, मुलाखत म्हणजे प्रश्नोत्तरांचे सत्र नाही. महत्त्वाच्या घटना व माहिती यांची उजळणी करा. शांत व प्रसन्न राहून सकारात्मक विचारसरणी ठेवा. मुलाखतीची प्रक्रिया सापेक्ष करता येणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठीही सकारात्मक दृष्टिकोन ठेवा व आनंदी राहा. वास्तव आयुष्यामध्ये वादविवाद टाळा आणि चांगल्या लोकांच्या बरोबरच राहा. हे जरी हास्यास्पद वाटत असले तरी हेच तुमचे भवितव्य घडवू व वा बिघडवू शकते.
प्रत्यक्ष मुलाखतीचा दिवस - मुलाखतीच्या आदल्या रात्री शांत व पुरेशी झोप घ्यावी. मुलाखत सकाळच्या सेशनमध्ये असेल तर व्यवस्थित नाष्टा घ्यावा व दुपारी असेल तर हलका आहार-दुपारचे जेवण घ्यावे. मुलाखतस्थळी सर्व आवश्यक कागदपत्रांसहित (कॉल लेटर, १० वीचे सर्टिफिकेट, पदवी प्रमाणपत्र, जातीचा दाखला (आवश्यकता असल्यास) इत्यादी वेळेच्या थोडे अगोदर पोहोचणे गरजेचे आहे. तिथल्या परिस्थितीशी स्वत:ला जुळवून घ्या. स्वत:ला शांत व स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक विचारांना मनामध्ये शिरकाव करू देऊ नका. सावकाश बोला व मन स्थिर राहू द्या. तुमच्या इंटरव्ह्यू पॅनेलचे नाव पाहून आश्चर्य किंवा भीती वाटून घेऊ नका. मुलाखतीच्या सभागृहात जाण्यापूर्वी स्वत:ला एकदा आरशात पाहून घ्या. थोडी उदासीनता आणि अस्वस्थता या प्रत्येक उमेदवाराला जाणवणा-या सामान्य गोष्टी आहेत. पण त्या गोष्टींना तुमच्या वरचढ होऊ देऊ नका. संतुलित राहून उत्तम कामगिरी करा......