**महाराष्ट्र्र राज्यातील एक भौगोलिक प्रदेश. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर या नऊ जिल्हयांचा समावेश सांप्रतच्या विदर्भात केला जातो. या भूप्रदेशाचा विस्तार उत्तर अक्षांश १९ अंश ५' ते २१ अंश ४७' आणि पूर्व रेखांश ७५ अंश ५९' ते ७९ अंश ११' यांदरम्यान झालेला असून यातील बहुतेक भाग तापी, पूर्णा तसेच वर्धा, पैनगंगा व वैनगंगा या नद्यांच्या खोर्यात मोडतो. विदर्भाच्या उत्तरेस आणि मध्यप्रदेश राज्य, पूर्वेस छत्तीसगड राज्य, पश्चिमेस जळगाव, औरंगाबाद व जालना तसेच दक्षिणेस परभणी व नांदेड हे महाराष्ट्र्रातील जिल्हे आणि आंध्र प्रदेश राज्य आहे. या प्रदेशाचे क्षेत्रफळ ४५.८६८ चौ. किमी.
**प्राचीन ग्रंथांत -विशेषत: ऋग्वेद उपनिषदे, महाभारत, रामायण, पुराणे यांत तसेच नंतरच्या काही पत्रांत याशिवाय तवारीख, प्रवाशांचे वृत्तांत आणि कोरीव लेखांतून विदर्भाचा उल्लेख वर्हाड, बेरार, वरदातट, विदर्भ इ. नावांनी करण्यात आलेला दिसतो. पयोष्णी, वरदा, वेणा इ. नद्यांचे व त्यांच्या काठांवरील तीर्थक्षेत्रांचे उल्लेख उपयुक्त साहित्यात येतात. विदर्भनावाच्या राजाने या प्रदेशात आर्याची वसाहत केली, त्यावरुनच या प्रदेशास विदर्भ हे नाव दिले गेले असावे, अशी आख्यायिका आहे. यदुवंशाच्या भोजनामक शाखेचा प्रमुख ऋषभदेव याचा पुत्र विदर्भ असल्याचे भागवतपुराणात म्हटले आहे. त्याला हा प्रदेश मिळाल्याने या प्रदेशाला विदर्भ हे नाव मिळाले असावे, असे सांगितले जाते.
**भूवर्णन :
उत्तरेस मेळघाट आणि दक्षिणेला बालाघाट यांदरम्यानच्या सुपीक पठारी खोर्याचा समावेश विदर्भात होतो. पयानघाट म्हणूनही हा प्रदेश ओळखला जातो. या भागातील सर्वात उंच शिखर बैराट हे अमरावती जिल्हयात चिखलदर्याजवळ आहे. सस. पासून या प्रदेशाची सरासरी उंची ५५३ मी. आहे. या भूप्रदेशाचा समावेश दक्षिण ट्रॅपमध्ये होतो. शिलारसापासून तयार झालेल्या अग्निजन्य बेसाल्ट खडकांनी तो बनलेला आहे. येथील भूस्तर प्रामुख्याने ग्रॅनाइट व चुनखडीयुक्त आहे. बरड, रेतीयुक्त , उथळ व चिकण दुमट जमिनी विदर्भातील डोंगराळ प्रदेशात आढळतात. मिश्र खडकापासून त्या तयार झालेल्या असून बेसाल्ट खडकापासून तयार झालेल्या काळया जमिनीप्रमाणेच त्यांचे गुणधर्म आढळून येतात.
या प्रदेशात दगडी कोळसा, मॅगॅनीज, लोह, क्रोमाइट, कायनाइट, कुरुविंद, सिलिमनाइट ही खनिजे आढळतात. मॅग्नीज आणि दगडी कोळसा या दोन्ही बाबतींत हा प्रदेश समृध्द असून त्यापासून फार मोठे उत्पन्न मिळते.
**विदर्भातील वर्धा व वैनगंगा या नद्या दक्षिण वाहिनी असून त्यांचा उगम महाराष्ट्र्राबाहेर मध्यप्रदेश राज्यात आहे. वर्धा-पैनगंगा यांच्या संयुक्त प्रवाहास 'प्राणहिता' म्हणतात. तापी, पूर्णा, पैनगंगा या अन्य प्रमुख नद्या असून तापी पूर्वेकडून पश्चिमेकडे, तर पैनगंगा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. पूर्णा ही तापीचीच उपनदी आहे. पैनगंगा ही वर्धा नदीची प्रमुख उपनदी असून पूस, अरुणावती, अडाण, वाघाडी, कुणी इ. अन्य उपनद्या होत. लोणार हे विदर्भातील एकमेव नैसर्गिक सरोवर असून त्यातील पाणी खारे आहे. भंडारा जिल्हयात सु. १५,००० तलाव आहेत, म्हणून यास महाराष्ट्र्रातील तलावांचा जिल्हा' म्हणतात.
**मेळघाट पर्वतउतारावर घनदाट जंगले असून त्यांतून उत्तम प्रकारचे सागवान, ऐन, धावडा, हळदू, शिसव, इ. इमारती व फर्न्ािचरचे लाकूड मिळते. येथील जंगलांत वाघ, चिज्ञ्ल्त्;ाा, हरिण, अस्वल, गवा, नीलगाय, काळवीट, इ. प्राणी आढळतात. विदर्भात पूर्वी गावराणी किंवा बेरारी या नावांनी घोडयांची पैदास होत असे. त्यांतील उमरडा व खामगावी या जाती काटक व दमदार म्हणून प्रसिध्द होत्या. पुढे दळणवळणाची आधुनिक साधने उपलब्ध झाल्यानंतर त्यांची पैदास जवळजवळ संपुष्टात आली आणि संकराचेही प्रयत्न झाले नाहीत.
**कापूस, गहू, ज्वारी, तूर, भात ही विदर्भातील प्रमुख पिके आहेत. यांशिवाय संत्री, आंबे व विडयाची पाने यांच्या बागा आणि मळे आहेत. लोकाचा मुख्य धंदा शेती असून त्याखालोखाल कापड विणण्याचा धंदा चालतो. सरकी काढण्याचे, कापूस दाबणी व वटण यांचे कारखाने असून काही ठिकाणी तेल काढण्याच्या गिरण्या आहेत. तेंदू पानांपासून विडया वळण्याचा धंदा या प्रदेशात मोठया प्रमाणात चालतो. विदर्भात वरील धंद्यांव्यतिरिक्त हातमाग, घोंगडया बनविणे, चामडी कमाविणे, लाकूड कापणी वगैरे अन्य धंदे मोठया प्रमाणात चालतात. या प्रदेशात गोंड, कोरकू, बंजारा, इ. आदिवासींची लोकसंख्या डोंगराळ भागात लक्षणीय आहे.
**इतिहास :
विदर्भाच्या भौगोलिक सीमांमध्ये निरनिराळया कालखंडांमध्ये बद्दल होत गेले आहेत. प्राचीन ग्रथांत उल्लेख केलेल्या विदर्भाची राजधानी कुंडिनपूर होय. प्राचीन काळी विदर्भात उत्तरेकडील नर्मदा नदीपासून दक्षिणेस कृष्ण नदीच्या खोर्यापर्यंत आणि पश्चिमेस ऋषिक देशापासून पूर्वेस कोसल देशापर्यंत पसरलेल्या विशाल भूभागाचा समावेश होत असे. नर्मदेच्या उत्तरेकडील भोपाळ व भिलसा राज्यांचा समावेशही विदर्भात होत असे. सम्राट अशोकाच्या धर्म-महामात्र या पदाधिकार्याचा चंद्रपूर जिल्हयातील देवटेक येथील शिलालेख, या भागावर मौर्याचे इ.स. पू. तिसर्या शतकात आधिपत्य असल्याचे दर्शवितो. शुंग काळात अग्निमित्र शुंग याने विदर्भ पादाक्रांत करुन माधवसेन राजाची बहीण मालविका हिच्याशी विवाह केला. या विषयावर पुढे कालिदासाने मालविकाग्निमित्र हे नाटक लिहिले. त्यानंतर सातवाहनांच्या आधिपत्याखाली विदर्भ होता. त्यांची नाणी अकोला जिल्हयातील तर्हाळा येथे मिळाली. सातवाहनानंतर वाकाटक वंशाचा या प्रदेशातच उदय झाला. त्या वंशातील राजांनी या प्रदेशावर सु. २५५ वर्षे राज्य केले. त्यांच्या राजधान्या अनुक्रमे नंदिवर्धन आणि प्रवरपूर व पवनार येथे होत्या. या वंशातील दुसरा रुद्रसेन यांस चंद्रगुप्ताने आपली मुलगी प्रभावती ही दिली होती. वाकाटकांच्या वेळी विदर्भात संस्कृत वा प्राकृत वाड्.मय कलाकौशल्य, व्यापार यांचा विकास झाला. दुसर्या प्रवरसेनाने प्रवरपूरला रामचंद्राचंे भव्य मंदिर बांधले, गडचिरोली जिल्हयातील मर्कंडी येथील मंदिराचे बांधकाम त्या काळात झाले. परमार नृपती भोजाचा पुतण्या जग्गदेव हा चालुक्य नृपती सहावा विक्रमादित्य याच्या आश्रयास गेला असता त्यास त्याने विदर्भाच्या एका भागाचा अधिपती नेमले. त्याचा इ. स. १११२ चा कोरीव लेख यवतमाळ जिल्हयातील डोंगरगाव येथे मिळाला आहे. त्यांनतर विदर्भावर यादवांची सज्ञ्ल्त्;ाा आली. त्यांचे अनेक लेख या भागात सापडतात. पुढे पेशवाईच्या अस्तानंतर नागपूर संस्थानांत ईस्ट-इंडिया कंपनीचा रेसिडेंट राहू लागला आणि संस्थानात गादीसाठी अंतर्गत स्पर्धा उद्भवली. तेव्हा १८५४ मध्ये इंग्रजांनी दत्ताक वारस नामंजूर करून नागपूर संस्थान खालसा केले. तत्पूर्वी १८५३ पासून ब्रिटिशांनी निजामास काही वार्षिक खंडणी देण्याचे कबूल करुन येथील राज्यकारभार आपल्या अखत्यारीत घेतला. ब्रिटिशकाळात वणी किंवा ऊन या जिल्हयाची स्थापना करण्यात आली. पुढे १९०५ मध्ये त्याचे यवतमाळ हे नामांतरण झाले. १९५६ च्या राज्यपुर्नरचनेनंतर विदर्भातील सर्व जिल्हे महाराष्ट्र्र राज्यात अंतर्भूत करण्यात आले. विदर्भाच्य विकासासाठी १९७३ मध्ये 'नागपूर करार' करण्यात आला, मात्र त्यांचे पालन झाले नाही. त्यांनतर विदर्भाच्या विकासातील असमतोल जाणून घेण्यासाठी अर्थतज्ञम्प्;ा वि.म. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑगस्ट १९८३ मध्ये एक समिती कार्यरत झाली. तिने एप्रिल १९८४ मध्ये आपला अहवाल दिला. याच सुमारास प्रादेशिक विकास मंडळे स्थापन करण्याच्या कल्पनेस चालना मिळाली. विदर्भासाठी वैधानिक विकास मंडळ १९९४ मध्ये अस्तित्वात आले आहे. तथापि स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागाणीची चळवळ अद्याप थंडावलेली नाही.
**प्रेक्षणीय स्थळे :
विदर्भात चिखलदरा, भामरागड व सोमनूर ही थंड हवेची ठिकाणे असून ताडोबा तलावाजवळ ताडोबा राष्ट्रीय अभयारण्य व मेळघाट जंगलाचे क्षेत्र संरक्षित केले आहे. या जंगलात ढाकणे-कोळखाज व खेमाडोर येथे विश्रामधामे बांधलेली आहेत. पुसद, रामटेक, लोणार, मेहेकर, वाशी व वार्शी टाकळी येथे यादवकालीन हेमाडपंती मंदिरे असून मर्कडादेव येथील राष्ट्रकूटकालीन मंदिरे त्यांवरील शिल्पांसाठी ख्यातनाम आहेत. या भागातील गाविलगड, नरनाळा हे किल्ले प्रसिध्द आहेत.