अनिवार्य इंग्रजीची तयारी


****भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा जसा ‘इंग्रजी शिक्षणाशी’ अविभाज्य संबंध आहे तसाच इंग्रजी भाषेचा आजही भारताच्या प्रगतीशी संबंध आहे. मात्र, नेहमीच चवीने चघळलेल्या विषयांपैकीच ‘इंग्रजीत मराठी टक्का कमी का?’ हाही विषय आहे. थोडक्यात, मराठी माणूस इंग्रजीला लवकर जवळ का करत नाही? हे न सुटलेल्या अनेक कोड्यांपैकी एक आहे.

****‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो पिणार तो गुरगुरणारच !’ यात शिक्षण हा शब्द काढून ‘इंग्रजी’ शब्द घातला तर तयार होणारा अर्थही तेवढाच महत्त्वाचा आहे. ‘इंग्रजीत बोलणा-याला सर्वच जण मान देतात व म्हणून तो गुरकावतो,’ असा तो अर्थ नाही, तर ज्याला इंग्रजी चांगले येते तो आज चांगल्या प्रकारे आयुष्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करू शकतो, असा याचा अर्थ आहे.

****‘जग हे एक खेडे आहे’ या मुळाशी असणारी ज्ञानवहनाची संकल्पना व त्याला इंग्रजी भाषेमुळे आलेली गती तर सर्वश्रुत आहे. यामुळेच आता इंग्रजीचे प्रशासनातील महत्त्व पूर्वापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे.

****प्रशासनाची इंग्रजी भाषा ही काहीशी क्लिष्ट वाटणारी आहे. जर तज्ज्ञांना ती वारा घालायला लावते तर सामान्यांना काय वाटत असेल? परंतु जेव्हा जमीन महसुलीचे नियम, सतत अद्ययावत करण्यात येणारे कायदे अधिका-यांना अभ्यासावे लागतात, जेव्हा कायद्याचा मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेत तो सहभागी असतो (सचिव वा तत्सम) त्या वेळीही त्याला इंग्रजीवरील प्रभुत्वाची मदत होत असतेच.

****त्यामुळे कायदा तयार करणे असो की त्याची योग्य ती अंमलबजावणी असो, अधिकारी हा कुठे ना कुठे इंग्रजीच्या संपर्कात येतो. इंग्रजी भाषा अनिवार्य आहे आणि त्यावरच यश अवलंबून आहे. एक परीक्षार्थी व एक अधिकारी म्हणून.

****सदरच्या लेखाचा उद्देश मात्र या विषयाचे परीक्षेतील महत्त्व सांगणे हा आहे. कारण की 800 गुणांपैकी 100 गुण या विषयाला निर्धारित केलेले आहेत. या गुणांचा विचार अंतिम यादीतील गुणवत्ता ठरवताना केला जाणार आहे. म्हणून या 100पैकी जास्तीत जास्त गुण आपल्याला मिळाले. म्हणजे ‘ब’ वर्गाचे पद न मिळता निश्चितपणे ‘अ’ वर्गाचे पद मिळेल. शेवटी यशापयशाचा आलेख ‘पद मिळाले का?’ या निकषांवर येऊन थांबणार आहे. त्यासाठी या विषयात मराठी भाषेप्रमाणेच नव्हे, त्याहून जास्त गुण मिळवावे लागतील.

****इंग्रजीचा फायदा म्हणजे व्याकरण सोपे आहे व वेगाने लिखाण करता येऊ शकते. हे सर्व इंग्रजीचे फायदेशीर गुण आपल्या क्षमतेने विकसित करण्याचा प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळेल.

****सर्वात मोठा अडथळा आहे इंग्रजीच्या भीतीचा. हा विषय आपल्याला फार घाबरवतो का? तसं घाबरण्यासारखं काही नसतं. भीती असते ती यातील अगणित शब्दसंग्रह व एकाच अर्थाचे अनेक शब्द याची. हे सारं लक्षात राहील? इथपासून वाटणारी भीती प्रत्यक्ष परीक्षेपर्यंतही सोबतच राहते. कधी कधी तर परीक्षेपुरते चांगले पाठांतर करून आलेले ‘शूर’ मावळे जर परीक्षेतील प्रश्नांची काठिण्यपातळी वाढलेली दिसली की ‘गर्भगळीत’ होतात. खरं पाहिलं तर जे इतर भाषांचं तेच इंग्रजीचं. त्यात एवढं भिण्यासारखं मात्र काहीच नाही.

****आपल्याला भाषेचा दर्जा ‘टाइम्स’ किंवा ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’च्या दर्जाचा ठेवायचा नाही, तर सोपी व लहान वाक्ये अशा स्वरूपाचा ठेवायचा आहे. आपले म्हणणे उत्तरे तपासण्यापर्यंत पोहोचले की झाले. त्यामुळे एवढा सोपा असणारा विषय बºयाचदा केवळ भीतीपोटी अवघड होऊन बसतो व त्यामुळे सतत गुण कमी मिळत राहतात.

****भाषेतील गुण वाढल्यामुळे मिळणारा आत्मविश्वास व वाढलेले गुण यांचा सकारात्मक परिणाम पुढील पेपर व त्यांच्या गुणावरही पडतो. लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा केवळ एक पेपरची नाही. यांची एक साखळी आहे. या साखळीतील प्रत्येक कडी (पेपर) तयारीच्या सर्व दृष्टीने मजबूत झाली तर निश्चितच सर्व साखळी मजबूत होईल (म्हणजे 800गुणांची तयारी) आणि पदप्राप्ती अशक्य वाटणार नाही.

*****असे काहीही आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून आपल्याला स्वत:साठी एक उच्च ध्येय ठेवावे लागेल. ते म्हणजे ‘मी इंग्रजीत कमी पडणार नाही.’ इंग्रजी भाषा आज सर्वच क्षेत्रांमध्ये आवश्यक असल्यामुळे याची भीती, समज-गैरसमज टाळून आपल्याला परिपूर्ण तयारी करावी लागेल. त्यासाठीच इंग्रजी भाषा-अभ्यासक्रम, गुण विभागणी व तयारीसाठीची मेहनत या दृष्टिकोनातून केलेला हा लेखनघाट आहे.

****भाषा ही संवादासाठी असते. संवाद हा मौखिक व लिखित या दोन्ही प्रकाराने अधिका-याला करावा लागतो. त्यासाठीच लिखित-भाषिक कौशल्ये तपासण्याची योजना केलेली आपल्याला आढळते. इंग्रजी भाषा अवघड वाटली (एक पारंपरिक गैरसमज) तरी परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला तिचे महत्त्व हे गुणांसाठी खूप आहे. गुणांसाठी तयारी करायला हवी. तयारीसाठी नियोजन हवे आणि ते करण्यासाठी ‘काय प्राप्त करायचे’ याची स्पष्टता हवी. म्हणजेच गुण किती मिळवायचे, यादृष्टीने एक संख्या निश्चित करू किती व कशा प्रकारे पेपर सोडवावा लागेल हा विचार महत्त्वाचा ठरतो.

   ******या सर्व प्रश्नांसाठी आपल्याला दिलेल्या अभ्यासक्रमाचे पुन्हा भाग पाडावे लागतील, ज्यामुळे आपण गुणांची प्राप्ती व त्याला देऊ शकणारा वेळ याकडे दुर्लक्ष न करता योग्य सराव करू शकतो. आपला मजबूत/बळकट अभ्यास घटक अजून बळकट करणे व कच्चे घटक बळकटीच्या जवळपास आणून अचूक नियोजन करणे आवश्यक आहे.

****** यासाठी जर आपण अभ्यासक्रम, फेररचना करून (गुणांच्या अनुषंगाने व काठिण्य पातळीने) लिहिला तर मात्र आपण चांगले गुण प्राप्त करू शकतो.

 अ) घटक हा तसा पाहिला तर आपल्या अंगवळणी पडलेला घटक आहे. पत्र/सारांश/परिच्छेदावरील प्रश्न/अनुवाद/व्याकरण घटक आपण शालेय जीवनापासून अभ्यासलेले असतात. त्यांची व्याप्ती, शब्दसंख्या आजच्यापेक्षा भलेही लहान असेल; परंतु त्यांचे स्वरूप या परीक्षेतील प्रश्नांप्रमाणेच होते. त्यामुळे या घटकांना आपण आपले हक्काचे गुण देणारे म्हणू शकतो. हे मात्र आपल्या क्षमतेवर अवलंबून आहे की, याचा उपयोग आपण कसा काय करणार?

पत्रलेखनाला, अनुवादाला व व्याकरणाला सरावाची जास्त आवश्यकता आहे. सराव केल्यावर यातून प्राप्त होणारे गुण आपल्याला मोठ्या यशाकडे घेऊन जातात. कारण 60 टक्के गुण या गटातील घटकांना आहेत. त्यांच्या तयारीसाठी साधने व वेळ कमी लागतो. म्हणून कामगिरी वाढते.

ब) परीक्षेला विचारलेले निबंध आपल्या ओळखीच्या विषयावरच आधारित असतात; परंतु आपण आपले विचार पूर्वी कधीच सूत्रबद्ध केलेले नसतात. जे इथे करायचे असते आणि इथेच आपला खरा ‘मानसिक’ त्रास सुरू होतो. मात्र, हा एक शिस्तबद्ध विचार करण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे आणि थोड्या प्रयत्नाने त्यात चांगले यश मिळू शकते.

क) या गटातील Communication Skills हा नावीन्यपूर्ण विषय/घटक. या अभ्यासक्रमात सामाविष्ट केलेला आहे. बोलता सर्वांना येते; परंतु संवाद प्रत्येक वेळी घडेलच असे नाही. संवाद हा बोलणारा आणि ऐकणारा यांच्यात होत असतो. कधी कधी हाच लिखित स्वरूपात होतो. त्यासाठी औपचारिकता म्हणून पाळावयाच्या काही बाबी आहेत. त्याच संवादाच्या कौशल्याची ‘परीक्षा’ आयोग घेत असतो.

  *** संवादाचे कौशल्य थोडे आजूबाजूला घडणारे; परंतु अभ्यास केलेले नसते. परीक्षेला प्रश्न हे लिखित व मौखिक दोन्ही संवादांवर आधारित असतात.  Report/Notice/Press Conference/Meeting हे सर्वपरिचित; परंतु तयारीने अपरिचित घटक आहेत. यासाठी म्हणून वेगळी तयारी हवी. या गोष्टींचे वृत्तपत्रातील वाचन हवे.

  ****‘Rapidex English Speaking Course’ हे दिल्लीतील एका प्रकाशन संस्थेचे व्याकरण व संवाद कौशल्य विकसित करणारे छान पुस्तक आहे. संवाद कौशल्याचे प्रश्न सोडवताना वरील नमूद पुस्तकाचा आधार घेतल्यास निश्चितच मोठा फायदा होईल.

एकंदरीतच अभ्यासाला सुरुवात करत असताना व वेळेची विभागणी करताना (अ) घटकासाठी सरावाचा वेळ वाढवावा लागेल तर (ब) घटकासाठी संपूर्ण तयारीसाठी जास्त वेळ द्यावा लागेल. (क) घटक मात्र नियमित लेखन सरावाने चांगले गुण मिळवून देतो.

इंग्रजीची सखोल तयारी झाली तरीही परीक्षेत गुण कमी मिळणा-या उमेदवारांची संख्या आपल्याकडे भरपूर आहे. याची कारणे आपण सतत ऐकलीच आहेत. ‘सतत’ मुळे कदाचित ती दुर्लक्षित राहत असावीत. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच चुकांकडे आपण वळतो.

महत्त्वाचे कारण आहे ‘भीती’. इंग्रजीची योग्य तयारी करणे व त्यातून आत्मविश्वास येणे गरजेचे असते. त्यासाठी तयारी करताना कुठलेही कच्चे दुवे राहून द्यायचे नाहीत. म्हणजे आपल्या तयारीबाबत आपोआप विश्वास वाटेल. ‘प्रत्यक्ष कामापेक्षा विचार’ जास्त केल्याने गुण पडत नाहीत. एखादी गोष्ट आपण परीक्षेत या प्रकारे करू, असेच फक्त ठरवण्यापेक्षा परीक्षेपूर्वीच त्या अमलात आणून रंगीत तालमी घडवल्यावर तयारीला अधिक धार येईल.

‘हस्ताक्षर’ तेही विशेषत: इंग्रजीचे ‘वळणदार’ करण्याच्या नादात आपण न वाचण्याइतके अस्पष्ट लिहू लागतो. यापेक्षा सुवाच्च व योग्य स्पेलिंग असणारे हस्ताक्षर जास्त लक्ष वेधणारे असते. अशा लहान पण महत्त्वाच्या गोष्टींमुळे हस्ताक्षर सुधारण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा.

****स्पर्धेत उतरल्यामुळे स्पर्धकही तयार साधनांचा वापर करायला भाग पडतो; परंतु साधनांचं परीक्षेमध्ये ‘पुनर्मुद्रण’ करायचं नसून आपलं भाषा कौशल्य दाखवायचं आहे याचा विसर पडतो. हे टाळलं नाही तर आपल्या उत्तरांमध्ये वेगळेपणही काही राहणार नाही व पेपर तपासणाºयालाही त्यामध्ये एक रटाळपणा जाणवेल आणि गुण कमी होतील.

***‘सराव’ हा शेवटचा पण अभ्यासाएवढाच महत्त्वाचा घटक आहे. कुठलीही भाषा व त्याची कौशल्ये सरावाने आत्मसात   होतात. याच नियमानुसार इंग्रजी सरावाशिवाय आपलीशी होणार नाही. सरावातही सातत्य हवं. त्याशिवाय सरावालाही काही अर्थ नाही.